top of page
Writer's pictureMahannewsonline

धक्कादायक! हळदी समारंभावेळी विहिरीत पडून १३ महिलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात विहिरीत पडून १३ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुशीनगर जिल्ह्यात लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या २५ हून अधिक महिला, मुली व लहान मुले विहिरीत पडल्याने झालेल्या दुर्घटनेत १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेबुआ नौरंगिया गावातील रहिवासी परमेश्वर कुशवाह यांचा मुलगा अमित कुशवाह याच्या लग्नापूर्वी बुधवारी रात्री उशिरा हळदीचा विधी होता. घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीसमोर विवाहपूर्व सोहळा सुरू होता. ज्या विहिरीजवळ हा कार्यक्रम सुरू होता ती विहिर लोखंडी जाळी लावून बंद करण्यात आली होती. हळदीच्या विधीसाठी उपस्थित असलेल्या २५ हुन महिला आणि तरुणी विहिरीवर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीवर उभ्या होत्या. काही वेळाने वजन न झेपल्याने अचानक ही जाळी तुटली आणि त्यावर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ खाली विहिरीत पडल्या. या घटनेनंतर लग्नघरात एकच गोंधळ उडाला.

ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले, मात्र, रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि मदतकार्य तीव्र केले. या दुर्घटनेत १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.



bottom of page