top of page
Writer's pictureMahannewsonline

"अश्रू" आणि "माफी"चा लाभ कोणाला ?

तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात द्रमुक आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात अद्रमुक या दोन पक्षांमध्ये हा जोरदार सामना होत आहे. प्रचारादरम्यान द्रमुक नेते ए. राजा यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे गेल्या दोन दिवसांपासून तमिळनाडूमधलं राजकारण ढवळून निघालं होतं. जाहीर सभेमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर ए. राजा यांनी आपल्या चुकीची जाहीर माफी मागितली. आता या "अश्रू" आणि "माफी"चा लाभ कोणाला होणार हे मतदानानंतर कळेलच.


काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत बोलताना ए राजा यांनी पलानीस्वामी यांची तुलना डीएमकेचे अध्यक्ष M. K. Stalin यांच्याशी केली. “स्टॅलिन यांनी १ वर्ष तुरुंगात काढलं आहे. ते जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. जनरल कौन्सिलचे सदस्य राहिले आहेत. युवा संघटनेचे अध्यक्ष, नंतर पक्षाचे खजिनदार, पुढे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे असं म्हणता येईल की स्टॅलिन यांचा योग्य पद्धतीने, ९ महिन्यांचा काळ काढून, वैध लग्न-विधीनंतरच (राजकीय विश्वात) जन्म झाला आहे. पण दुसरीकडे इडाप्पडी हे वेळेपूर्वीच जन्मलेले आणि अचानक आलेले मूल आहेत”, असं राजा म्हणाले होते.


ए. राजा यांच्या या वक्तव्यानंतर रविवारी प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांना स्टेजवरच रडू आलं. “मी फक्त स्वत:साठी बोलत नाही. पण जर एखाद्या मुख्यमंत्र्याच्याच आईला हे असं काही ऐकावं लागत असेल, तर तुमच्या माता आणि महिला सुरक्षित असतील का? ते सत्तेत आले, तर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता”, असं म्हणत चेन्नईत झालेल्या प्रचारसभेत पलानीस्वामी स्टेजवरच रडले!


“मुख्यमंत्र्यांना माझ्या वक्तव्यामुळे दु:ख झाल्याचं माध्यमांमध्ये पाहून मला अतीव वेदना झाल्या आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. पण मी मनापासून घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करतो. जर त्यांना माझ्या विधानामुळे वाईट वाटलं असेल, तर राजकारणाच्याही पलीकडे जाऊन त्यांची माफी मागण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही”, असं म्हणत ए. राजा यांनी पलानीस्वामी यांची जाहीर माफी मागितली आहे.



bottom of page