top of page

आजीबाईचा बटवा

साधासुध्या आजारासाठी डॉक्टरांकडे जाण्याची नवी प्रथा हल्ली रूढ झाली आहे.  काही आजारांवर डॉक्टर खरोखर औषधोपचार करतात तर काही आजारातून तात्पुरती सुटका मिळवून देण्यासाठी ते वेदनाशामक औषधांचा आधार घेतात. डॉक्टरांनी केलेल्या औषधोपचारांमुळे आजार बरा होत असला तरी या औषधांचे दुष्परिणाम म्हणून कित्येक वेळा नवीन आजार उद्भवतात आणि त्यावर मग पुन्हा उपचार करावे लागतात. निरामय आरोग्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली तरी ऋतू बदलांमुळे तसेच काही प्रकारच्या तात्कालीक कारणांमुळे सर्दी, ताप,खोकला, डोकेदुखी, पोटदुखी यासारखे आजार होतात.

सदा सर्वदा निरोगी राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असली तरीही अधून मधून अनेक प्रकारचे आजार आपल्या घरात प्रवेश करीत असतात . आहारविषयक सवयी बदलल्यामुळे  पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, मलावरोध यासारखे आजार उद्भवतात तर शरीर यंत्रणेतील बिघाडामुळे मूतखडा, मूळव्याध रक्ताल्पता, रक्तदाब आणि हृदयविकार यासारखे आजार उत्पन्न होतात. याशिवाय अर्धशिशी, मिरगी, फेफरे यासारखे मानसिक विकार आणि कंबरदुखी, सांधेदुखी यासारखे हाडांचे विकारही वयोमानानुसार निर्माण होतात.

आजारांनी डोके वर काढले की डॉक्टरांकडे जाणे हा एकच उपाय आपल्याकडे असतो तरी रात्र-अपरात्री डॉक्टरांकडे जाणे गैरसोयीचे होते तेव्हा काय ?, असा प्रश्न बहुतेक वेळा निर्माण होतो. सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करणारी औषधे आपल्याच घरात आणि परिसरात असतात. आपल्याला त्यांची माहिती नसल्यामुळे आपण त्यांचा उपचार म्हणून वापर करीत नाही.

आपल्या स्वंयपाकघरात आणि अवती भोवती अनेक प्रकारच्या वस्तू आणि वनस्पती आहेत. एक वनस्पती म्हणून त्यांची आपल्याला माहिती असली तरीही एक औषधी म्हणून आपल्याला त्याची काहीच माहिती नसते. आपल्या स्वंयपाक घरात विशेषतः मसाल्याच्या पदार्थात वापरले जाणारे लसून, कांदे, हिंग, मुळठी, लवंग, मिरे, आले, ओवा, जिरे, दालचिनी हे सारे मसाले औषधी आहेत. स्वंयपाकघरात वापरले जाणारे गहू, मका यासारखी धान्ये आणि कडधान्येही औषधी आहेत. आपल्या भोवतालच्या परिसरात असलेल्या लिंबू, कडूलिंब, तुळस, पुदिना यासारख्या वनस्पती आणि सफरचंद, आवळा, जांभूळ, चिकू, केळी, डाळींब, सीताफळ यासारखी मोसमी फळे या सर्वांतच अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म ठासून भरलेले आहेत.

बुहेतक आजारांवर आपल्या घरातीलच औषधी वनस्पतींचा वापर करण्याची आपली खूप प्राचीन पंरपरा आहे. घरातील कोणाही व्यक्तीला काही आजार झाला किंवा घरातील कोणीही आजीकडे काही दुखत असल्याची तक्रार केली की आजी आपला बटवा सोडून त्यातून काही तरी औषधी काढायची आणि उपचार करायची. आजीच्या ओषधाने अशा प्रकारचे अनेक आजार गायब झाल्याचा अनुभव बहुतेकांनी घेतला आहे.


घरातील आजीला पंरपरेने माहीत असलेले घरगुती औषधांच्या उपचाराचे हे ज्ञान कुटुंब व्यवस्थेतून आज आजी गायब झाल्यामुळे लुप्त व्हायला लागले आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी आणि तिचे जतन करण्यासाठी म्हणून आजार आणि त्यावरील घरगुती औषधांचे रामबाण उपचार याची माहिती आम्ही आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी आणि दीर्घायू करण्यासाठी देत आहोत. 
 

bottom of page