top of page

पाण्याने भरलेल्या खड्ड्यात स्कॉर्पिओ गाडी पडून भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

पाण्याने भरलेल्या खड्ड्यात स्कॉर्पिओ गाडी पडून झालेल्या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झालेत. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून, सर्व बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य हाती घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व जण खापरा तारबारी येथे मुलीचे लग्न जमवण्यासाठी गेले होते. तेथून ते किशनगंज जिल्ह्यातील नुनिया गावात परतत होते. या दरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून स्कॉर्पिओ गाडी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. अपघातातील सर्व मृत किशनगंज जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

गंगा प्रसाद यादव, तांडव लाल यादव, करण लाल यादव, अमरचंद यादव, कालीचरण यादव, रामकिशन यादव, गुलाब चंद यादव आणि माणिक लाल शर्मा अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 8 जणांची नावे आहेत.


bottom of page