top of page
Writer's pictureMahannewsonline

भीषण अपघात! क्रुझर दरीत कोसळल्याने ८ ठार

नंदुरबार : जिल्हयातील तोरणमाळ भागातील सिंदी दिगर घाट परिसरात प्रवासी वाहतूक करणारी क्रुजर गाडी दरीत कोसळ्याने भीषण अपघात घडला. या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. या क्रुजर मध्ये जवळपास २० प्रवासी होते. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास सिंदी दिगर घाटातून प्रवाशी वाहतुक करणारी क्रुझर जवळपास वीस प्रवाशी घेवून जात होती. यात चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने गाडी थेट सिंदी दिगर घाटातील दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, क्रुझर गाडी दरीत कोसळल्यानंतर त्या गाडीचा अक्षरशा चुराडा झाला व जीपमधील आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. क्रुझरमधील काही प्रवाशांनी गाडी दरीत कोसळत असताना बाहेर उड्या टाकल्या ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली.

दुर्घटना घडली तो भाग अतिदुर्गम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवत आहे. तर अपघातमधील जखमींना तोरणमाळसह अन्य स्थानिक ठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले जात आहे. पोलीस अधिक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


bottom of page