top of page
Writer's pictureMahannewsonline

एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

पुणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर जांबुत फाटा येथे घडली.

या अपघातात राजेश निवृत्ती लेंडे (वय ३०), त्यांची पत्नी सुरेखा (वय २७), मुलगा यश (सर्व रा. भटकळवाडी, ता. जुन्नर) यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने भटकळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

पुतणीचा विवाह असल्याने राजेश लेंडे हे आपल्या पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना नारायणगाव येथे कपडे खरेदीसाठी घेऊन गेले होते. परत येत असताना पुणे नाशिक महामार्गावर जांबुत फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १४ जेएच २२०६) पाठीमागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात नंतर मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली.कारचालक किरकोळ जखमी झाला असून या प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.


bottom of page