top of page

स्कार्पिओ आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा जागीच मृत्यू

स्कार्पिओ आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्य व त्यांच्या मुलासह ६ जणांचा मृत्यू झाला.तर सहाजण जखमी झाले आहेत. रविवारी (२२ मे) दुपारी चारच्या सुमारास पंढरपूर-मोहोळ (जि. सोलापूर) रस्त्यावरील पेनूर येथे हा अपघात झाला.

डॉ.आफ्रीन मुजाहिद खान-आतार (वय ३० ) व त्यांचे पती डॉ. मुजाहीद इमाम आतार (वय ३५) आणि त्यांचा मुलगा अरमान (वय ५) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तसेच डॉ. आफरीन यांचे बंधू इरफान नूरखान खान (वय ४०) , त्यांच्या पत्नी बेनजीर इरफान खान (वय ३७ ), आणि त्यांची मुलगी इनामा इरफान खान (वय २ ) यांचाही या अपघातात मृत्यू झाला असून हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरातील रहिवासी आहेत.

मोहोळ येथील प्रतिष्ठित डॉ. खान कुटुंबीयांतील डॉ. आफरीन खान-आतार व त्यांचे पती डॉ. मुजाहीद आतार, दोन्ही मुले आणि भाऊ-भावजयासह कौटुंबिक कामानिमित्त परगावी गेले होते. तेथून पंढरपूरमार्गे मोहोळकडे परत येत असताना त्यांच्या मोटारीला (एमएच १३ डीटी ८७०१) समोरून म्हणजे मोहोळहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या स्कार्पिओ मोटारीची (एमएच १३ डीई १२४२) जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, डॉ. खान दाम्पत्य यांच्यासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. या अपघाताची प्राथमिक नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास चालू होत आहे.

डॉ. आफरीन यांचा मुलगा अरहान (वय ८) याच्यासह दुसऱ्या वाहनातील अनिल हुंडेकरी (वय ३५), मनीषा मोहन हुंडेकरी, राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे व मंदाकिनी शेटे (सर्व रा. गादेगाव, ता. पंढरपूर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या सर्वांना वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. हुंडेकरी व शेटे कुटुंबीय सोलापुरात लग्नकार्य आटोपून आपल्या गावाकडे परत निघाले होते.



bottom of page