top of page
Writer's pictureMahannewsonline

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो उलटला; ३५ जण जखमी

विठुरायाचे दर्शन घेऊन पंढरपूरवरुन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पो चालकाला डुलकी लागल्यामुळे टेम्पो दुभाजकावर आदळून उलटला. या अपघातात जवळपास ३५ भाविक जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जालना-चिखली रस्त्यावरील मेरा खुर्द फाट्याजवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खांडवीसह विविध गावातील ४८ भाविक हे पंढरपुर येथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गेले होते. मंगळवारी दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना झोप आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो ( एम.एच. ०४/ जी ८४१३ ) रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळून पलटी झाला. या अपघातात २० जण किरकोळ, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मेरा खुर्द फाट्यावरील लोकांना कळताच लगेच जखमींना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघातात सखुबाई सोनोने, कन्यावती गायकवाड, ज्ञानेश्वरी इंगळे, सुरेखा महाजन, ताई धोरण, दशरथ वाकोडकर, गजानन तायडे, अर्चना तायडे, शारदा गणेशे, त्रिगुणा काटे, मनिषा काटे, गिता काटे, पंचफुला यादगिरे, पुष्पा यादगीरे, सुशिला थोरात, कुसूम खारोडे, केसर वरजे, अशोक महाले यांच्यासह ३५ भाविक जखमी झाले आहेत.


bottom of page