top of page
Writer's pictureMahannewsonline

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही...

नवी दिल्लीः परमबीर सिंग यांच्या पत्र प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपने जोरदार हल्ला चढवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल , शिवसेनेचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे उपस्थित होते. जवळपास अडीच तास महाराष्ट्रातील एकूण स्थितीवर चर्चा करण्यात आली.


अंबानींच्या घराबाहेर कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्ये प्रकरणी महाराष्ट्र एटीसए आणि एनआयएकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासून नक्की ठोस माहिती समोर येईल. यातून ज्यांनी गुन्हे केले आहेत, त्यांना शोधून काढलं जाईल. सरकारने आता या प्रकरणी अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीतील काही उणीवा समोर आल्या आहेत. यामुळे मुंबई पोलीसातील पारदर्शकता वाढवली पाहिजे. या सर्व बाबतीत चौकशी होण्याची गरज आहे. आणि जुलीओ रिबेरो यांच्या मार्फत ही चौकशी किंवा त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. पण आता या प्रकरणी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

bottom of page