top of page
Writer's pictureMahannewsonline

अनिल देशमुख यांच्या नागपूरसह मुंबईतील घरावरही ईडीचा छापा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी आज सकाळी छापा टाकण्यात आलेला असताना ईडीच्या दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

आज (शुक्रवारी) सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे छापे टाकले. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. त्यांनतर अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी ५ एप्रिल रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. ११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. त्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.


bottom of page