top of page
Writer's pictureMahannewsonline

येत्या शैक्षणिक वर्षापासून नांदेडमधील शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करावी

मुंबई : परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य शासनाने नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात ‘नर्सिंग कॉलेज‘ मंजूर केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात संदर्भातील बैठक आज ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, नांदेड शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय.आर.पाटील, आयुषचे संचालक कुलदीप राज कोहली, उपसचिव प्रकाश सुरवसे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५० प्रवेश क्षमतेचा बीएससी परिचर्या अभ्यासक्रम सुरू होणार असून संबंधित अधिष्ठाता यांनी याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. या महाविद्यालयास आवश्यक प्राचार्य आणि व्याख्याते यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ देण्यात यावेत.

मंजूर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही तात्काळ सुरू करावी नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील मंजूर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही तात्काळ सुरू करावी. सध्या महाराष्ट्रावर कोविडचे संकट असल्याने वैद्यकीय सेवेवर प्रचंड ताण आहे. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांची सतत आवश्यकता भासत आहे. वैद्यकीय सेवेशी निगडित विभागाला आवश्यक असणारी पदे भरण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आल्याने रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी.

वर्ग ४ ची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास परवानगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग ४ ची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास परवानगी देण्यात आल्याने याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी. आयुष संचालकांनी आयुर्वेद महाविद्यालयातील वर्ग ३ ची पदे भरण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना मार्गदर्शन करावे व तसेच कार्यवाही पूर्ण करण्यावर भर द्यावा. सध्या कोविडची दुसरी लाट असून तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आयुष संचालक यांनी या संदर्भातील प्राथमिक पूर्वतयारी करावी, असे निर्देश दिले.


bottom of page