top of page

धक्कादायक : आईनेच केला पाच महिन्याच्या चिमुकल्याचा खून

आईनेच आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा उशिने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील तरडगाव (ता. फलटण) येथे घडली आहे. आरती गायकवाड असं सदर महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरतीनेच लोणंद पोलीस ठाण्यात फोन करुन याची माहिती दिली. दरम्यान खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरडगाव (ता. फलटण) येथील पांढरी येथील सौ.आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस ठाण्यात स्वतः फोन करुन तिने तिच्या पाच महिन्याच्या मुलाला १२ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जिवे मारून पुरला आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा नाही तर मी आणखी दुसऱ्या कोणाचा तरी खून करीन, असे सांगितले होते. त्यावरून लोणंद पोलिसांनी तिच्याकडे जावून खात्री केली असता तिने तिचा लहान मुलगा कार्तिक याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक व तोंड दाबून जिवे मारून खून केल्याचे सांगितले.

त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहीती घेतली व सदर महिलेस ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलीसात फिर्याद दिली असुन महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. आरती गायकवाडला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता, चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.


bottom of page