top of page
Writer's pictureMahannewsonline

जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या या आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर एकाची प्रकृती गंभीर आहे.असून यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात १७ रुग्ण उपचार घेत होते. या विभागातल्या एसीला आग लागली. बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसंच आगीमुळेही गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरुन झाला याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसंच मृतांच्या परिवाराला आवश्यक ती मदत केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “मी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून मी काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होती. जे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तसंच मृतांच्या परिवाराला मदत देण्यात येणार आहे”.


"नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो." असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.


bottom of page