top of page
Writer's pictureMahannewsonline

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा

सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमात पोलीस आयुक्त बैजल यांचे आवाहन

सोलापूर- विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे, त्याच क्षेत्रात त्यांना करियर करण्याची संधी शिक्षक व पालकांनी द्यावी. आवडीचे क्षेत्र असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. विद्यार्थ्यांनी कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आयोजित सतराव्या युवा महोत्सवातील विजेत्यांना पोलीस आयुक्त बैजल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

पोलीस आयुक्त बैजल म्हणाले की, कोविड संकट काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑनलाइन पद्धतीने युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अंगभूत कलागुणांना विकसित करण्याची एक संधी लाभली. वास्तविक विद्यार्थ्यांनी आपल्याला जे आवडतं तेच करावं. मनामध्ये कोणताही न्यूनगंड बाळगू नये. आवडीच्या क्षेत्रात अपार मेहनत घेऊन कष्ट करावे आणि यश संपादन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, कोविड काळात ऑनलाइन युवा महोत्सव घेणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे राज्यातील एकमेव आहे. कडक शिस्तीत व नियमांचे पालन करत युवा महोत्सवाचे यशस्वी नियोजन झाले. यामुळे युवा विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रेरणा मिळाली. आनंदित होऊन विद्यार्थी कलाप्रकार सादरीकरणात दंग झाली. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यापीठात विविध मार्ग विकसित करण्यात आले आहेत. विद्याशाखा बद्दल अभ्यासक्रम, इनक्युबेशन सेंटर, स्टार्टअप, विविध स्किल कोर्सेस असे विविध उपक्रम विद्यापीठात सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले. बक्षीस वितरणाचे वाचन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे यांनी केले.

*यांचा झाला सन्मान* सतराव्या युवा महोत्सवाचे प्रथम पारितोषिक प्राप्त केलेल्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या संघाने द्वितीय तर पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांकाचा बक्षीस प्राप्त केला. यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला. नियतकालिक स्पर्धेमध्ये पारंपरिक गटात दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय आणि हिराचंद नेमचंद कॉलेजने प्रथम क्रमांक पटकाविला. संगमेश्वर कॉलेज द्वितीय तर वालचंद कॉलेजला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. केबीपी पंढरपूर व सांगोला कॉलेजला उत्तेजनार्थचे बक्षीस मिळाले. नियतकालिके स्पर्धेत व्यवसाय गटात स्वेरी कॉलेज-प्रथम, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी- द्वितीय, उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर- तृतीय तर कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूरने उत्तेजनार्थचे पारितोषिक पटकाविले. यांचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचाही गुणगौरव सोहळा पार पडला.


bottom of page