top of page
Writer's pictureMahannewsonline

१५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव द्या, अन्यथा ...

आंदोलकांचं सरकारला अल्टिमेटम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणीसाठी सिडकोच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भुमीपूत्र तसंच प्रकल्पग्रस्तांनी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी सरकारला विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि बा पाटलांचं नाव मिळालं नाही तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद पाडू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी मानवी साखळी करून लक्ष वेधलं होतं. त्यानंतर नवी मुंबईतील सिडको भवनाला आंदोलक आज (२४ जून) घेराव घालण्यात आला. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालय परिसरात एकाच गर्दी केली होती. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटीलदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

या मोर्चात मोठा जनसमुदाय उतरणार असण्याची शक्यता असल्याने बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद ठेवण्यात आला होता. या परिसरात फक्त कार्यालयीन कामासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येत होता. तसंच अंतर्गत वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. या परिसरातून दररोज किमान १५ हजार लहान-मोठय़ा वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक वळविण्यात आली होती.

आंदोलनासाठी स्पेशल टि शर्ट आणि मास्क बनविण्यात आले आहेत. आजच्या आंदोलनासाठी नागरिकांमध्ये ते वाटण्यातही आले आहेत. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनस्थळी दि.बा पाटलांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.



bottom of page