top of page
Writer's pictureMahannewsonline

अमेरिकेचा तालिबान्यांना इशारा!

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर आणि गुंतागुंतीची होऊ लागली आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या जगभरातल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सर्वच राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. या मदतकार्यामध्ये तालिबान्यांकडून अडथळा निर्माण केला गेला तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल”, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तालिबान्यांना दिला आहे.

अफगाणिस्तानमधून १४ ऑगस्टपासून आत्तापर्यंत काबूल विमानतळावरून १३ हजार नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आलं असल्याची माहिती जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर हे इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात कठीण अशा एअरलिफ्टपैकी एक आहे. याचा शेवट काय होईल, हे मी आत्ताच सांगू शकणार नाही, असंही जो बायडेन यावेळी म्हणाले.

“आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेलं बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केलात, तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल”, असंही बायडेन यांनी यावेळी सांगितले.


“आम्ही काबूल विमानतळ पूर्णपणे सुरक्षित केलं आहे. सध्या काबूल विमानतळाभोवती आणि धावपट्टीवर संरक्षण पुरवण्यासाठी ६ हजार अमेरिकी सैनिक तैनात करण्यात आले आहेत”, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, अफगाणिस्तानमधून अमेरिकी आणि नाटोच्या फौजा जरी माघारी आल्या असल्या, तरी अमेरिकेचा दहशतवादविरोधातील लढा कायम राहणार असल्याचं यावेळी बायडेन यांनी स्पष्ट केलं. यासाठी आमचे सहकारी आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच देशांसोबत आम्ही मिळून काम करू, असं बायडेन यांनी सांगितलं.


bottom of page