top of page
Writer's pictureMahannewsonline

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सज्ज; उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतही स्वतंत्र खाटांची तरतूद

'सूपर स्पेशालिटी'तील 'चिल्ड्रेन वॉर्ड'ची पालकमंत्र्यांकडून पाहणी चिल्ड्रेन वॉर्डमध्ये ८० खाटांची उपलब्धता त्यापैकी ५१ ऑक्सिजन बेड २० आयसीयू बेड

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. सूपर स्पेशालिटी रुग्णालयात बालकांवरील उपचारांसाठी ८० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आला, तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही बालरुग्णांसाठी ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात आले असून, खासगी बालरुग्णालयांतही ऑक्सिजन बेडची तजवीज करण्यात आली आहे. उपचार यंत्रणा उभारतानाच संभाव्य लाटेचा धोका कमी करण्यासाठी नियमपालन, सातत्यपूर्ण जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा व विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

सूपर स्पेशालिटी रुग्णालयातील ‘चिल्ड्रेन वॉर्ड’ची पाहणी पालकमंत्र्यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या कमी झाली असली तरी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. या साथीपासून बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपचार सुविधांत वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात आले आहे. खासगी बालरुग्णालयांतही खाटा आरक्षित ठेवण्यात येत आहेत. संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी ही तयारी करण्यात येत आहे. हे करत असताना लसीकरण कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

खासगी पेडियाट्रिक कोविड रुग्णालयात पारिजात हॉस्पिटलमध्ये ४० व गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये ६० खाटा आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी दिली.


bottom of page