top of page
Writer's pictureMahannewsonline

मुलासाठी कायपण! ; सायकलवरून केला 300 किमीचा प्रवास

पोटच्या मुलांसाठी आईवडील काहीही करण्यासाठी तयार असतात. सदैव आपल्या मुलांचाच ते विचार करत असतात. त्यात प्रश्न जर मुलाच्या जीवाचा असेल तर मागेपुढे न पाहता स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. अशीच एक घटना कर्नाटकमधील म्हैसूर याठिकाणी घडली आहे. मानसिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या मुलासाठी त्याच्या वडिलांनी 300 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आणि मुलासाठी औषध आणलं.

म्हैसूरमधील कोप्पालू गावात राहणारे 45 वर्षीय आनंद, एक बांधकाम मजूर आहेत. त्यांचा दहा वर्षांचा मुलगा भैरश मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याने त्याच्यावर बेंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँण्ड न्यूरो-सायन्सेस (NIMHANS ) येथे उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की जर या औषधाचा एक डोस चुकला तर त्याला पुन्हा 18 वर्षे हा डोस द्यावा लागेल. म्हैसूरमध्ये बर्‍याच ठिकाणी त्यांनी औषध शोधले. पण ते फक्त बंगळुरु मधील NIMHANS मध्येच उपलब्ध असल्याची माहिती मिळाली.


लॉकडाऊनमुळे त्यांची कोणत्याही टॅक्सी किंवा ऑटोवाल्याने मदत केली नाही. मोटारसायकलवरूनही बंगळुरुमध्ये जाण्यास कुणी तयार झालं नाही. त्यामुळे आनंद यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून बंगळुरु गाठलं. जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास करून ते NIMHANS मध्ये पोहचले. आनंद यांना पाहून रुग्णालयातील कर्मचारीही हैराण झाले. डॉक्टरांनी तातडीने त्यांना औषध दिलं आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला.


bottom of page