top of page
Writer's pictureMahannewsonline

अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार ; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करावी असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत.


मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर यांनी केलेल्या याचिकेसह अन्य याचिकांवरील निर्णय बुधवारी राखून ठेवला होता. तो निर्णय आज देण्यात आला. निर्णय देताना न्यायालयाने सांगितलं की, ‘जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा’.


दरम्यान परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. परमबीर सिंग यांची याचिका उच्च न्यायालयाने रद्द केली. “नियुक्ती किंवा बद्दल्यांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात ” असं न्यायालयाने स्पष्ट केलं.



bottom of page