top of page
Writer's pictureMahannewsonline

काँग्रेसचे आमदार अंतापूरकर यांचं निधन

काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं ५५ व्या वर्षी कोरोनानं निधन झालं आहे. अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईत हलवण्यात आलं होतं. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून दिली.


“माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना,” अशी माहिती देत अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


bottom of page