top of page
Writer's pictureMahannewsonline

तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलाय का? ...

"शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?... आज शिवजयंती आहे, ही पद्धत नाही बोलायची", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खडसावले. शिवनेरी येथे शिवजयंतीच्या सोहळ्यावेळी ते बोलत होते.

शिवनेरी गडावर आज शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजी छत्रपती उपस्थित होते. यावेळी अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणावरून अजित पवार यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "मी तुम्हाला मघाशी बोलू दिलं. तुम्हाला सारखं सारखं बोलायचं नाही. एक मिनिट… ही भाषा नाही. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलाय का? तुमचं पहिल्यांदा मी ऐकून घेतलं होत. आता तुम्ही माझं ऐका. आज शिवजयंती आहे, ही पद्धत नाही बोलायची. आम्हाला कळत नाही का?, असं म्हणत तरुणांना खडसावले. त्यानंतर लगेचचं जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष करण्यात आला..

"मला एक कळत नाही, मी, बाळासाहेब थोरात काय, दिलीप वळसे-पाटील आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हाला काही अभिमान नाही का आमच्या जातीचा, समाजाचा ... ?आम्ही काही कमी पडणार आहोत ?, आम्हाला काही कळत नाही ?" असा सवाल ही अजित पवार यांनी यावेळी केला. शिवाजी महाराजांनी काय शिकवलं? महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. ही गोष्ट मान्य करावी लागेल. तरुण मुलांचं रक्त सळसळत असतं,.हे आम्हाला मान्य आहे, परंतु आरक्षणात येणाऱ्या कायदेशीर अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


bottom of page