top of page
Writer's pictureMahannewsonline

... तर २ एप्रिलपर्यंत कठोर निर्णय घेतला जाईल; अजित पवारांचा इशारा

काही दिवसांपासून राज्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेत या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी "परिस्थिती अजूनही गंभीर आहे, अशीच परिस्थिती राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. नाईलाजास्तव २ एप्रिलपर्यंत तो निर्णय घेतला जाईल" असे सांगितले.

आजही काही भागात जनतेच्या मनात सुरुवातीला जी भिती होती ती राहिलेली नाही. लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. २ एप्रिलपर्यंत तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.



काय आहेत नवे नियम?

  • खासगी रुग्णालयातील ५० टक्के बेड करोनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • शाळा-महाविद्यालयं ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.

  • मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम असेल. सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.

  • लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक संख्या अजिबात नकोय. अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी असेल.

  • सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू राहतील, नंतर ते बंद असतील.

आजच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना विचारलं आहे की लसीकरणाची ३१६ केंद्र दोन्ही शहरांत आहेत, ती दुप्पट करू शकतो का? तसं केलं तर लसीकरणाचा कार्यक्रम पुण्यात सर्वात जास्त घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करता येईल. त्यावर प्रकाश जावडेकरांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


bottom of page