top of page

अजित पवार यांच्या हस्ते म्हाडाच्या 2 हजार 908 सदनिकांसाठी लॉटरीची ऑनलाईन सोडत

कोविड काळातही म्हाडाच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद; सामान्य जनतेचा ‘म्हाडा’वर विश्वास असल्याचे द्योतक -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : सध्या कोरोनाच्या संकटाचा काळ सुरु आहे. या संकटाच्या काळातसुध्दा म्हाडाच्या 2 हजार 908 घरांसाठी 57 हजार जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. घरांसाठी इतक्या मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याचाच अर्थ सामान्य लोकांचा ‘म्हाडा’वर विश्वास असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सामान्य जनतेचा हाच विश्वास ‘म्हाडा’ने जपण्याचे, वाढविण्याचे आवाहन केले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) 2 हजार 908 सदनिकांसाठीची ऑनलाईन लॉटरीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई, पुण्यासारख्या शहरात आपलंही एक घर असावं असे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हाडाच्या लॉटरीत घरांसाठी अर्ज करणे हा सुध्दा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सगळ्यांनाच घर मिळावं, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु आज फक्त 2 हजार 908 घरं असल्याने तितक्याच जणांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्यांचा नंबर लागणार नाही त्यांनी निराश न होता प्रयत्न करत राहिलं पाहिजे. एक ना एक दिवस प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. 2022 पर्यंत सर्वांसाठी घर हा आपला कार्यक्रम आहे. आज 2 हजार 908 घरांच्या लॉटरीची सोडत हेसुध्दा त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल आहे. पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या नव्याने वाढणाऱ्या शहराचा विकास नियोजनबध्द करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. राहण्यासाठी राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा क्रमांक लागतो. हे राज्यात सर्वोत्तम असणारं आपल पुणे शहर देशात सर्वोत्तम बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु या. म्हाडाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. पुणे शहराच्या विकासासाठी म्हाडाने आणखी चांगले योगदान देण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. आज लॉटरीच्या निमित्त ज्यांना हक्काचे घरं मिळणार आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन. इतरांनी निराश न होता म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. यावेळी उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन लॉटरीतील विजेत्या सदनिका धारकांना प्रतिनिधीक स्वरुपात त्यांच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.


bottom of page