top of page
Writer's pictureMahannewsonline

नारायण राणेंच्या "सीएम बीएम गेला उडत..." या वक्तव्यावर अजित पवारांचं उत्तर

मुंबई : राज्यभर झालेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. अशाच एका दौऱ्याप्रसंगी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्द्ल खालच्या स्तराची भाषा वापरून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता, असं अजित पवार म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका” अस वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असलं तरी असंच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद मधे आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतिधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली नाही”.


“अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता,” असंही यावेळी ते म्हणाले. काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना अरे तुरे शब्द वापरले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अनेक मोठे व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री झाले. यांच्या काळात कधीही कोणीही, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अनुद्दार काढले नव्हते,” असं सांगत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.

पूर्ण पाणी कमी झाल्याशिवाय शेतांची अवस्था कळू शकत नाही. पाणी ओसरलं आहे तिथे पंचनामे सुरु आहेत. त्यानुसार मदत केली जाईल असं सांगताना अजित पवारांनी विरोधकांसह सर्वांनी जिल्हाधिकारी, प्रांत, मामलेदारांना आपली काम करु द्यावी असं आवाहन केलं. “वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासोबत आम्ही नोडल अधिकारी नेमले असून ते माहिती देतील. व्हीआयपी गेले तर त्यांच्या मागे सगळे फिरत राहतात आणि कामावर परिणाम होतो,” असं अजित पवारांनी सांगितलं.



bottom of page