top of page
Writer's pictureMahannewsonline

तुम्हाला खऱ्या बातम्या द्यायला काय होतं...

पुणे :"अजित पवार यांच्यावर हायकोर्टामध्ये बारामतीच्या कुठल्यातरी जमिनी बद्दल केस दाखल, इतका धादांत खोटा आरोप. कशा करता तुम्ही हे धंदे करता?, तुम्हाला खऱ्या बातम्या द्यायला काय होतं ... मीडियानेही स्वतःची विश्वासार्हता जनतेच्या मनातनं कमी करण्याचा प्रयत्न करू नये" असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, " तुम्हा सर्व मिडीयाला आणि सर्व चॅनेल्सना मला स्पष्ट सूचना करायची आहे की , काल मी पण बघितलं... माझा दुरान्वये संबंध नसताना अजित पवार यांच्यावर हायकोर्टामध्ये बारामतीच्या कुठल्यातरी जमिनी बद्दल केस दाखल, इतका धादांत खोटा आरोप. कशा करता तुम्ही हे धंदे करता? तुम्हाला खऱ्या बातम्या द्यायला काय होतं ? काल असंच एका चॅनेलने ती दाखवली होती. वास्तविक ती तुम्ही कन्फर्म करा ना, की असं काही झालं होतं का ... काहीही बातमी देता. जरूर बातम्या देण्याचा अधिकार तुम्हा सर्वांना आहे, त्याबद्दल सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना मिडियाबद्दल आदरच आहे. पण मीडियानेही स्वतःची विश्वासार्हता जनतेच्या मनातनं कमी करण्याचा प्रयत्न करू नये. मी जर तुम्हाला दाखवल की, कशा पण धादांत खोट्या बातम्या असतात तर तुमचीही मान शरमेने खाली जाईल... याची नोंद सर्व मिडीया, सर्व चॅनेल्स आणि संपादकांनी घ्यावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे.


कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असून केरळनंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. नियम पाळले पाहिजेत, अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल. त्यामुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

शाळा सुरु करण्याबद्दल बोलताना पवार म्हणले, शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचं काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील.


काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे, मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा आहे. यावर आंदोलन करून काही पक्ष काही तरी साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात , असंही अजित पवारांनी सांगतिलं.


bottom of page