top of page
Writer's pictureMahannewsonline

वर्ध्याच्या चिमुकलीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉड्समध्ये नोंद

एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून केले पूर्ण


वर्धा : आर्या पंकज टाकोणे या तीन वर्षीय चिमुरडीने एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण करीत विक्रमाला गवसणी घातली आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉड्समध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली.

पूलगाव येथे राहणाऱ्या आर्याने वध्रेतील गांधी पुतळा ते सेंट अ‍ॅन्थनी स्कूल या दरम्यानचे एक किलोमीटरचे अंतर सहा मिनिट व एका सेकंदात पार केले. इंडिया बुकसाठी हे अंतर धावण्यास आठ मिनिटे तर एशिया बुकतर्फे सात मिनिटांचा वेळ आर्याला देण्यात आला होता. मात्र आर्याने हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात म्हणजे सहा मिनिटे एका सेकंदात पूर्ण करीत विक्रमाची नोंद केली. त्याची घोषणा संस्थेचे आयोजक डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी केली.

आर्यां पंकज टाकोणे ही तीन वर्षांची चिमुकली पुलगाव येथील रहिवासी आहे. तिने दीड वर्षाची असतानाच पोलिसात असलेले आणि व्हॅलिबॉलचे नॅशनल खेळाडू असलेल्या वडिलांसोबत धावण्याचा सराव सुरू केला. कधी डांबरी तर कधी मातीच्या रस्त्यावर धावणार्‍या आर्यालाचा कमीत कमी वेळात जास्त अंतर कापण्याचा सराव आता कामी आला. पोलीस कर्मचारी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यादृष्टीने कसून तयारी करून घेतली होती. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तिला विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी अमरावतीत झालेल्या मॅरेथॉनमध्ये आर्या धावली होती. सर्वात लहान धावपटू म्हणून तिने पुरस्कार जिंकला होता. यापूर्वी चीनमधील तीन वर्षीय बालकाने एक किलोमीटरच्या अंतराची शर्यत आठ मिनिटात जिंकल्याची नोंद आहे.


bottom of page