top of page
Writer's pictureMahannewsonline

यंदाही वारी कोरोनाच्या सावटाखाली, विठ्ठल दर्शन नाहीच

आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० मानाच्या पालख्यांनाच परवानगी देण्यात आली असून देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत त्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला २ बसेस असं दहा पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची काल बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.


परवानगी देण्यात आलेल्या दहा मानाच्या पालख्या

१) संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

२) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

३) संत सोपान काका महाराज ( सासवड )

४) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

५) संत तुकाराम महाराज ( देहू )

६) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

७) संत एकनाथ महाराज ( पैठण )

८) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

९) संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

१०) संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )


bottom of page