top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; संशयित दहशतवादी ताब्यात

मुंबईः देशात घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसनं मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. याबाबत 'एनआयएन'नं वृत्त दिलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी झाकिरला ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळून लावत एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्याच प्रकरणात झाकिरला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयामध्ये मध्यरात्रीपासूनच हालचाल दिसू लागली होती. रात्री ३ च्या सुमारास महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, यासंदर्भातली टिप दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडूनच आल्याची देखील माहिती मिळत आहे. एटीएसनं ताब्यात घेतलेल्या झाकीरचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन असल्याची माहिती आहे. तसंच, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांसोबतही झाकीरचे संबंध होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी जान मोहम्मदनं झाकीरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते, अशी माहिती सांगण्यात येते.


bottom of page