top of page
Writer's pictureMahannewsonline

एक दोन ... नाही तब्बल ५७ मुलींना फसवलं; चौघींबरोबर संसारही थाटला, केली लाखोंची फसवणूक

पुणे: एका तरुणाने एक दोन नाही तर तब्बल ५७ तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसविल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुणे आणि परिसरातल्या तब्बल ५७ तरुणींना फसवणाऱ्या आरोपीचं नाव योगेश गायकवाड असं आहे. पुण्यातील एका तरुणीने तक्रार केल्यानंतर योगेश हा पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश गायकवाड हा मूळचा औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. स्वतः लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करायचा. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून आधी मैत्री करायचा. मग सोशल मीडियावरुन मुलींना जाळ्यात ओढायचा. एकामागोमाग एक करत त्याने तब्बल ५७ मुलींना गंडवलं, चौघींबरोबर संसारही थाटला. तरुणींना लग्नाचे आमिष दाखवायचा. त्यांच्या कुटुंबातल्या मुलाला लष्करात भरती करतो असं सांगून त्यांच्याकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन पोबारा करायचा. सैन्यात नोकरी लावण्याच्या नावाखाली २० हून अधिक तरुणांची फसवणूक केली आहे. अहमदनगर येथील संजय शिंदे हा योगेश याला यात मदत करत होता. तो स्वत: ला लोकांसमोर योगेशचा अंगरक्षक सांगायचा. पोलिसांनी संजय आणि योगेश यांच्याकडून १२ सैन्य गणवेश व इतर गुन्हेगारी साहित्य जप्त केले आहे.

योगेशने आतापर्यंत चार विवाह केले असून त्याच्या दोन बायका पुण्यातील, एक अमरावती आणि एक औरंगाबादची आहे. दोन विवाह आळंदीच्या धर्मशाळांमध्ये व इतर दोन मंदिरात झाले. पुण्यातल्या एका तरुणीच्या तक्रारीनंतर योगेशला पोलिसांनी सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या. आणखी कुणा मुलींना या योगेश गायकवाडने फसवलं असेल तर त्यांनीही पुढे या आणि तक्रार करा असं पोलिसांनीही आवाहन केलं आहे.

bottom of page