top of page
Writer's pictureMahannewsonline

ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं पुण्यात निधन

बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) पुण्यात निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून एमबीए चे देखील शिक्षण घेतले होते. १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


मागील वर्षीच त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जवळपास पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. सर्व स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.


bottom of page