top of page
Writer's pictureMahannewsonline

मोदींच्या आढावा बैठकीत उशिरा पोहोचलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची तडकाफडकी बदली

नवी दिल्लीः पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंडोपाध्याय यांची केंद्र सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. आयएएस अधिकारी बंडोपाध्याय यांना ३१ मे रोजी दिल्लीत नॉर्थ ब्लॉकमधील सामान्य प्रशासन विभागासमोर हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये यास चक्रवादळाने झालेल्या नुकसानीही हवाई पाहणी केली. यास चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा आणि मदत आणि बचावकार्याची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली होती. पण या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि मुख्य सचिव अर्धा तास उशिरा आले आणि काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यांचं हे वर्तन सेवा नियमांच्याविरोधात असल्याचं म्हटलं जात आहे.


केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या बदलीचे पत्र जारी केले आहे. १९८७ च्या कॅडरचे आयएएस अलप्पन बंडोपाध्याय यांना तात्काळ भारत सरकारच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएएस नियम १९५४ च्या ६ (१) नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारने बंडोपाध्याय यांना तात्काळ सेवामुक्त करावं असं आवाहन केंद्र सरकार करत आहे, असं पत्रात म्हटलं आहे.


bottom of page