top of page
Writer's pictureMahannewsonline

बोगस लसीकरण प्रकरणी बारामतीतून एकाला अटक

मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण प्रकऱणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. राजेश पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला बारामती (जि. पुणे ) येथील भिगवण रोडवरील अमृता लॉजवरुन येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी राजेश याने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होतं. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांकडून एका पत्रकाद्वारे या कारवाईबद्दलची माहिती देण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण?

३० मे २०२१ रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या सोसायटीमधील ३९० सदस्यांकडून प्रत्येकी १२६० रुपये घेत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी एकूण ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेली १२,४०,००० रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. यापुर्वी गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींनी लसींचा पुरवठा करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. तसंच गुन्ह्यातले मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंह आणि मनीष त्रिपाठी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. गुन्ह्यासाठी वापरल्या गेलेल्या लसींचा पुरवठा चारकोपच्या शिवम हॉस्पिटलमधून होत असल्याने या हॉस्पिटलचे डॉ. शिवराम पटारिया आणि निता पटारिया यांनाही अटक करण्यात आली आहे.


bottom of page