top of page
Writer's pictureMahannewsonline

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकींसह चौघीजणी बुडाल्या; तिघींचा मृत्यू

बीड: कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकींसह चौघी जणी नदीत बुडाल्याने तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आलं. मिरगाव ( ता. गेवराई, जि. बीड ) येथे ही दुर्दैवी घटना घडली असून मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. रंजना गोडबोले, शीतल गोडबोले आणि अर्चना गोडबोले यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रंजना गोडबोले या त्यांची मुलगी आणि दोन पुतणींसह कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत दहा वर्षांच्या दोन मुली असल्याने खोल पाण्यात न जाता, पाण्याचा अंदाज घेऊन कपडे धुणे सुरु होते. मात्र गोडबोले कुटुंबावर काळाने घाला घातला. रंजना गोडबोले आणि त्यांच्यासोबत असलेली मुलगी आणि दोन पुतण्या पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाल्या. चौघीही बुडू लागल्याने नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळालं नाही. यापैकी तिघींचा बुडून मृत्यू झाला. तर आरती गोडबोले या चिमुकलीला वाचवण्यात यश आलं. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.

मुलींसह महिला बुडाल्याचं वृत्त मिरगावात वाऱ्यासारखं पसरलं. एकाच घरातील तिघींचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गोडबोले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन दिवसांच्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय गेल्यावर्षीच्या पावसामुळेही आधीच गोदावरी नदीला मुबलक पाणी आहे, गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर अशा घटना दरवर्षी घडतात. नदीला पूर आल्यानंतर नदीकाठच्या लोकांना केवळ सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतो.


bottom of page