top of page
Writer's pictureMahannewsonline

भंडारा जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा

लस उपलब्ध होणार

भंडारा : कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असून त्याची संक्रमण शक्ती तुलनेने जास्त आहे. याच कारणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिले. या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नियोजन करावे असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

खाजगी रुग्णालयातील कोविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. दराचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश द्यावेत असेही त्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगले काम करत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्र्यांनी बेड उपलब्धता, आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, लसीकरण, लस उपलब्धता, रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्धता व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आदी बाबत सविस्तर आढावा घेतला. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा विषाणू जास्त धोकादायक असून त्याची संक्रमण प्रक्रिया वेगाने होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. नव्या विषाणूची साखळी तोडण्यासाठी लोकांनी स्वतः वर कडक निर्बंध घालून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले. उद्योग व्यापराबाबत एक दोन दिवसात शासनस्तरावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शन नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे ते म्हणाले.

लस उपलब्ध होणार भंडारा जिल्ह्यात लसीकरणाचा वेग चांगला असून जिल्हा सध्या अग्रस्थानी आहे. एक दोन दिवस पुरेल एवढेच डोज शिल्लक असले तरी जिल्ह्याला लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत आपण आरोग्यमंत्री व विभागीय आयुक्त यांच्याशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांनी कुठलीही शंका न घेता लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखा मेडिकल स्टोअर्समध्ये रेमडेसिवीर वाजवीपेक्षा अधिक दराने विकली जात असून रुग्णांना आवश्यकता नसतांना अनेक वेळा रेमडेसिवीरच प्रिस्क्राईब केली जाते. ही बाब खासदार सुनील मेंढे व आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित केली. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, रेमडेसिवीरचा काळा बाजार तात्काळ रोखण्यात यावा. तसेच खाजगी डॉक्टर व औषध विक्रेते यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात.

बेड व ऑक्सिजन उपलब्ध भंडारा येथे आयसीयू व ऑक्सिजन बेड उपलब्ध असून सामान्य रुग्णालयात अतिरिक्त 140 बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयातही बेड निर्माण करण्यात आले आहेत. सोबतच कोविड केअर सेंटर मध्येही बेड उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी बैठकीत दिली. कोविड केअर सेंटर मध्ये भोजनाची व्यवस्था उत्तम असेल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी सामान्य रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.


bottom of page