भुशी डॅम परिसरातील अतिक्रमण हटवले
पुणे : दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात मोठी दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर प्रशानसाला खडबडून जाग आली आहे. त्यांनी भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली आहे.
लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. भविष्यात अन्सारी कुटुंबियासारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत, म्हणून प्रशासनाने तातडीनं हा निर्णय घेतला असल्याचे समजते. या कारवाईवेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.