top of page
Writer's pictureMahannewsonline

विधानपरिषद निवडणूक: भाजपचे उमेदवार ठरले; पाच उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, अमल महाडिक, अमरिष पटेल, वसंत खंडेलवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसमधून भाजपात आलेले राजहंस सिंह यांचा मुंबई उपनगरात राहणाऱ्या उत्तर भारतीय मतदारांमध्ये मोठा प्रभाव आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपने राजहंस यांना उमेदवारी दिल्याचे दिसत आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली.

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. धुळे नंदुरबार मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार व माजी मंत्री अमरिष पटेल यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे तर अकोला-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात वसंत खंडेलवाल हे भाजपचे उमेदवार असणार आहेत.

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार १० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. मुंबई, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलढाणा वाशिम, नागपूर या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.



bottom of page