भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे राहत असलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी त्यांचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होतं. त्याचा बदला म्हणूनच आज भाजपा कार्यर्त्यांकडून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.