top of page
Writer's pictureMahannewsonline

कर्नाटकमध्ये अखेर नेतृत्वबदल; बसवराज बोम्मई होणार नवे मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर भाजपाच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून दबाव असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आपल्यावर कोणताही दबाव नसून आपण स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं येडियुरप्पांनी सोमवारी स्पष्ट केलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. आता बसवराज बोम्मई यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं असून बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली.

बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील आभार मानले आहेत. “आम्ही एकमताने बसवराज बोम्मई यांची भाजपा विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालीच बसवराज बोम्मई कठोर मेहनत घेतील”, असं येडियुरप्पा यांनी जाहीर केलं आहे. बोम्मई यांचा शपथविधी होईपर्यंत येडियुरप्पा कर्नाटकचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. मंगळवारी बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली.

कोण आहेत बसवराज बोम्मई?

६१ वर्षीय बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. बोम्मई यांनी गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे.


bottom of page