top of page
Writer's pictureMahannewsonline

कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ द्या – बाळासाहेब पाटील

सातारा : कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी असणारा विभाग आहे. या विभागामार्फत ज्या ज्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात त्या प्रभावीपणे राबवून याचा लाभ गरजू शेतकऱ्यांना द्या, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, पाणी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, कृषी विभागातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना औजारांचे वाटप केले जाते त्या औजरांचा वापर होतो का नाही याची पाहणी कृषी विभागाने करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री पाटील यांनी केली.

काळ्या गव्हाच्या लागवडीला प्रोत्साहन द्या जिल्ह्यात काही ठिकाणी नव्या जातीचा काळा गहू लागवड केला आहे. हा गहू आरोग्यासाठी लाभदायक असून याचा दरही अधिक आहे. या काळ्या गव्हाची विक्री आपल्या जिल्ह्यात करुन अधिकाधिक शेतकऱ्यांना या काळ्या गव्हाची लागवड करण्यासाठी कृषी विभागाने प्रवृत्त करावे. या गव्हाचे फायदे काय आहेत याची नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

शासनाने विकेल ते पिकेल ही शेतकऱ्यांसाठी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.

या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यासमोर शेती करत असताना येणाऱ्या अडचणी मांडल्या ह्या अडचणी सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी या बैठकीत दिले

bottom of page