top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्रातील 'या' केंद्रीय मंत्र्यांनी वाचवले प्रवाशाचे प्राण; पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक

ठिकाण : दिल्लीवरुन मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान... विमानातील प्रवाशाची तब्येत अचानक बिघडते... विमानातील क्रू मेंबर्सकडून उद्घोषणा... कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती ... हे ऐकताच एक डॉक्टर त्या प्रवाशाजवळ जाऊन त्या प्रवाशाला प्रथमोपचार देतात... त्या प्रवाशाचा जीव वाचविणारे ते डॉक्टर होते महाराष्ट्रातील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड. या कामाची दखल घेत पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून कराड यांचं कौतुक केलं आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या ६ई १७१ या विमानातून प्रवास करत होते. यावेळी अचानक कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. तेव्हा केबिन क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केली. हे ऐकताच डॉक्टर भागवत कराड जे स्वतः व्यवसायाने डॉक्टर आणि सर्जन आहेत, ते मदतीसाठी धावून आले. डॉक्टर कराड यांनी प्रवाशाला प्रथमोपचार दिले आणि फ्लाइटमध्ये उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी किटमधून प्रवाशाला इंजेक्शनही दिले.

इंडिगो एअरलाइन्सने डॉक्टर कराड हे रुग्णाला मदत करत असतानाचा फोटो ट्विट करत त्याचं कौतुक करत डॉक्टर कराड यांचे आभार मानले आहेत. “आम्ही आपले ऋणी आहोत. आपल्या कर्तव्याबद्दल नेहमीच दक्ष असणाऱ्या या केंद्रीय मंत्र्याचं आम्ही कौतुक करतो. डॉक्टर कराड यांनी एका प्रवाशाला मदत करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली तयारी ही खरोखरच प्रेरणादायी आहे,” असं इंडिगोने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनीही इंडिगोचे हे ट्विट कोट करुन रिट्विट करत, “ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे,” असं पंतप्रधान म्हणाले. मोदींच्या या ट्विटला रिप्लाय देताना डॉक्टर कराड यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच तुम्ही दाखवलेल्या ‘सेवा आणि समर्पण’ या मार्गावरुनच मी जनतेची सेवा करत आहे, असंही कराड म्हणाले.


bottom of page