top of page

कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू... पण रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी गावकऱ्यांची रुग्णालयात गर्दी

मध्य प्रदेशातील एका गावात कुत्र्याने चावल्यामुळे म्हैस आणि तिच्या बछड्याचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. ग्वाल्हेर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, ग्वाल्हेर जिल्ह्यातील चांदपुर (डबरा) गावात एका कार्यक्रमात तब्बल ७०० हुन अधिक लोकांनी दह्याची कोशिंबीर खाल्ली. मात्र ज्या म्हशीच्या दुधापासून दही आणि त्यानंतर कोशिंबीर करण्यात आली होती, तिचा दोन दिवसांपूर्वी कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला. यानंतर तीच्या बछड्याचाही मृत्यू झाला. हे कळताच गावकरी भयभीत झाले. हे सर्व गावकरी अँटी रेबिज इंजेक्शन घेण्यासाठी चक्क जिल्हा रुग्णालयात पोहोचले. लोकांचा मोठा जमाव पाहून वैद्यकीय कर्मचार्‍यांना धक्का बसला.

डॉक्टरांनी इतकी मोठी रांग पाहून इंजेक्शन देण्यास नकार दिला. यावरुन बराच वाद झाला. रेबीजचा साठाही मोजकाच असल्याने काही गावकऱ्यांनाच हे इंजेक्शन दिले गेले. दूध प्यायल्याने किंवा कोशिंबीर खाल्ल्याने रेबीजसारखा आजार पसरत नसल्याचे डॉक्टरांनीही गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एसडीएम यांनी समजावल्यानंतर गावकऱ्यांची भीती कमी झाली.


bottom of page