top of page
Writer's pictureMahannewsonline

मुंबई : दरड कोसळून ११ तर इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तर चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे ११ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये विक्रोळीमधील एक दुमजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि मलब्याखाली या घरांमध्ये राहणारे लोक दबले गेले. चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केलं. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. सकाळी पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं, तरी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, एकीकडे चेंबूरमध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये एक दुमजली इमारत कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मुसळधार पावसामुळे हिंदमाता, सायन, किंग सर्कल, कुर्ला अशा अनेक सखल भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, हवामान खात्याने रविवारीही मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


bottom of page