top of page
Writer's pictureMahannewsonline

सिनेस्टाईल थरार! भरदिवसा पाठलाग करून तरुणाचा खून; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार हत्याराने वार करून , दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना जेरबंद केले आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर ( रा. परशुराम चौक, विद्यानगर, चिंचवड) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आकाश उर्फ मकसूद विजय जाधव (रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानिफनाथ कामानिमित्त रविवारी सकाळी चिखली परिसरात आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास कानिफनाथ हे रस्त्यावर एका तरुणाशी बोलत होते. त्यावेळी आकाश तेथे गुपचूप आला. काही कळायच्या आत त्याने पिशवीत आणलेल्या धारदार हत्याराने कानिफनाथ यांच्यावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने कानिफनाथ सैरावैरा धावत सुटले. पाठलाग करत आकाशने कानिफनाथला काही अंतरावर गाठले आणि पुन्हा वार केले. कानिफनाथचा मृत्यू होत नसल्याचे पाहून त्याने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. हा प्रकार साने चौकापासून सुमारे दोनशे मीटरच्या अंतरावर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घडला. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सदर खुनाची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीच्या शोधात पथके रवाना करण्यात आली. पोलीस कर्मचारी नरहरी नानेकर यांना आरोपी हा चिखली परिसरातील लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा रचून आरोपीला घटना घडल्यानंतर दोन तासात आरोपींना ताब्यात घेतले. आकाशसह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.


bottom of page