top of page
Writer's pictureMahannewsonline

विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही...

उद्धव ठाकरे यांनी साधला फडणवीस यांच्यावर निशाणा


सिंधुदुर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यानंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं ठाकरे यांनी सांगितलं.


कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.


मोदींकडून गुजरातची पाहणी करुन जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवर विचारण्यात आलं असता आपल्याला त्यात राजकारण आणायचं नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी मी विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही असा टोला लगावला. विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचं आणि माझं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी या नात्यात बाधा येणार नाही, असंही ते म्हणाले.


bottom of page