top of page
Writer's pictureMahannewsonline

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी; काँग्रेसची पहिली यादी जाहीर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. एकूण उमेदवारांपैकी ४० टक्के उमेदवारी ही महिलांना देण्याचं वचन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिलं होतं. त्यानुसार ५० मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.काँग्रेस पक्षानं निवडणुकांसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीमध्ये उन्नाओ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला देखील उमेदवारी देण्यात आली आहे.

२०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात भाजपाचा तत्कालीन आमदार कुलदीप सेनगर याचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणी दीर्घकालीन खटला चालल्यानंतर कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेनगरला भाजपानं पक्षातून देखील आधीच निलंबित केलं आहे. या प्रकरणातील पीडितेची आई आशा सिंह यांचा काँग्रेसच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये लक्ष्य करण्याची शक्यता आहे. पूनम पांडे नामक आशा कार्यकर्तीला देखील उमेदवारी देण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये शाहजगानपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांना भेटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पूनम पांडे यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तन केलं होतं. यावरूनही बराच वाद झाला होता.

आज जाहीर करण्यात आलेल्या एकूण १२५ उमेदवारांपैकी ४० टक्के महिला असून ४० टक्के तरुण आहेत या ऐतिहासिक धोरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात नव्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे”, असं प्रियांका गांधी यांनी यावेळी सांगितले.


bottom of page