top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : "... त्यांनी दिलेलं पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही" हे ऐकून गावकऱ्यांनी केली एकच गर्दी

मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यामध्ये कोरोना संदर्भातील एका अफवेमुळे शेकडो लोकांनी मंदिरात गर्दी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरामध्ये दोन पऱ्या आल्या असून त्यांनी दिलेलं पाणी प्यायल्याने कोरोनाचा आजार होणार नाही अशी अफवा कोणीतरी पसरवली. राजगडपासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या चाटूखेडामधील मंदिराबाहेर शेकडोच्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लोक जमा झाले. कोरोनाच्या भीतीने पऱ्यांकडून मिळणारं पवित्र पाणी प्यायल्यास कोरोना होत नाही तसेच झाला असेल तर ठीक होतो असा समज या लोकांचा झाला होता.

दोन महिलांच्या अंगात देवी आल्याचं सांगून त्याच पऱ्या असल्याचं सांगत अफवा उठवण्यात आली. पवित्र पाणी मिळवण्यासाठी पाहता पाहता मंदिराबाहेर शेकडोच्या संख्येने जमा झाले. त्यांच्यात धक्काबुक्की सुरु झाली. यावेळी अनेकांनी मास्क लावले नाहीत ना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं. या गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले. या घटनेसाठी दोषी असणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलांनी गावकऱ्यांच्या हातावर पाण्याचे शिंतोडे उडवत ते पाणी चाटण्यास सांगितलं. हे पाणी शरीरात गेल्याने करोनाचा संसर्ग होणार नाही असा दावा या महिलांनी केला. तसेच ज्याला करोना झालाय तो त्यामधून पुर्ण बरा होईल आणि त्याला पुन्हा संसर्ग होणार नाही असा दावा महिलांनी केला. यावर विश्वास ठेऊन शेकडोच्या संख्येने लोक येथे जमा झाली. व्हिडीओ फोटो व्हायरल झाल्यावर तासाभराने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अफवा पसरवल्याचा ठपका ठेवत दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी गावामध्ये स्पीकरवरुन घोषणा करत अफवांवर विश्वास ठेऊन अंधश्रद्धेला बळी पडू नका असं आवाहन केलं आहे.


bottom of page