top of page

तरुणानो आजार अंगावर काढू नका, तात्काळ डॉक्टरला दाखवून उपचार सुरु करा

सातारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून यामध्ये तरुण वर्ग जास्त बाधित होत आहेत. अशा बाधित रुग्णांनी आजार अंगावर न काढता तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे .येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट मंजूर केले आहेत तेथे तात्काळ प्लँट सुरु करण्याच्या कामास प्राधान्य द्यावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लँट सुरु करावेत, याबाबत साखर कारखान्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी विविध रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कामाबरोबर कोरोनाबाबतची इतर कामे करीत आहेत. त्यांचा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत केले.


या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

bottom of page