top of page
Writer's pictureMahannewsonline

सावधान ! आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. कोरोनावरील संशोधनातून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. हा आळशी लोकांसाठी धोक्याचा इशाराच आहे.

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये नुकतेच हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यात म्हंटलं आहे की, व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून अशा लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींनी व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली (चालणं/फिरणं) कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागत आहे, असं नव्या अभ्यासात दिसून आलं आहे. धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.


अमेरिकेत जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० मध्ये या संशोधनासाठी ५० हजार कोरोना बाधितांचा अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्यांना करोना संसर्गाचा आणि करोनामुळे जीविताचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता शारीरिक हालचाल न करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्गाचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्ती व्यायाम, शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, अशा ४८ हजार४४० लोकांमध्ये करोनाची लक्षणं अधिक दिसून आली. यात काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. काहींना आयसीयूची भरती करावं लागलं, काहींचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे.


bottom of page