top of page
Writer's pictureMahannewsonline

अजितदादा, जरा सांभाळून बोला; आम्ही फाटके आहोत… आम्ही बोलायला लागलो तर...

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना अजितदादा, जरा सांभाळून बोला; आम्ही फाटके आहोत. … आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असे वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारवर निशाणा साधला. ते रविवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने रविवारी (३० मे) कोल्हापूर येथे कोरोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.


“अजित पवारांना कुणीही तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलेलं नव्हतं. त्यामुळे आपण ज्या भाजपासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान त्यांनी बाळगायला हवे. तुम्हाला राष्ट्रवादीचे २८ आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती आहे,” अशी टीका पाटील यांनी केली.


मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या सर्व मागण्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. पण सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे रस्त्यावर उतरून संघर्ष नको, ही संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही. संभाजीराजे रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असतील, तर भाजपा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.


काय म्हणाले होते अजित पवार?

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं,’ असं पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या शैलीतून प्रत्युत्तर दिलं होतं. “सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केलं की, झोपेत केलं होतं? ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजपा नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार,” असं अजित पवार म्हणाले होते.


bottom of page