top of page
Writer's pictureMahannewsonline

कर्जबाजारी झाल्याने केला स्वतःच्या लहान बाळाला विकण्याचा प्रयत्न

आई-वडिलांसह एजंट महिला पोलिसांच्या ताब्यात


देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने अनेक व्यवसाय बंद पडले. काहींच्या नौकऱ्या ही गेल्या. त्यामुळे सर्वसामान्यांपुढे मुलाबाळांचे पोट कसे भरायचे? असा मोठा प्रश्न समोर असताना कल्याणमध्ये एक विचित्र घटना घडली. कर्जाचा बोझा वाढल्यानं एका दाम्पत्याने पाच महिन्याच्या लहान बाळाला विकण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. साईनाथ भोईर (रा. शहाड) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. साईनाथ यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत.. लॉकडाऊनमुळे रिक्षाचा व्यवसाय बंद पडला त्यामुळे साईनाथ भोईर आणि त्यांच्या पत्नी पल्लवी भोईर हे कर्जबाजारी झाले. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोझा झाला. पत्नी, मुलाबाळांचे पोट कसे भरायचे? असा प्रश्न त्यांना सतत सतावित होता. साईनाथ भोईर यांच्या संपर्कात मानसी जाधव नावाची एक महिला आली. मानसी हिने साईनाथ भोईर यांना त्यांचा पाच महिन्याचा मुलगा विकणार का? असा प्रश्न विचारला. यासाठी तिने त्यांना काही वेळ विचार करायलाही दिला.

डोक्यावर कर्जाचा बोझा असल्यामुळे भोईर दाम्पत्यांनी तो पर्याय स्वीकारत अवघ्या 90 हजार रुपयात आपल्या पाच महिन्याच्या बाळाला विकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मानसी ते बाळ पुढे 2 लाखात विकणार होती, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.


मानसी कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या दीपक हॉटेल येथे भोईर दाम्पत्याकडून पाच महिन्याच्या बाळाला विकत घेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचत मानसीला आणि भोईर दाम्पत्याला रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे महिला एजंट मानसी जाधव हिने आतापर्यंत किती गरीब कुटुंबियांच्या गरिबीचा फायदा घेत अशी किती मुले विकत घेतली, याचा तपास पोलिस करीत आहेत.


bottom of page